तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे एल्गार
तामलवाडी | प्रतिनिधी
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिक गाळाधारक शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, पान स्टॉलधारक, दूध विक्रेते, स्नॅक्स सेंटर चालक तसेच इतर छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्यावसायिकांना हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तामलवाडी टोलनाका परिसरात शांततामय आंदोलन करण्यात आले.
टोलनाका परिसरात अनेक वर्षांपासून विविध स्थानिक व्यावसायिक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न या व्यवसायांवर अवलंबून असून, बहुतांश व्यावसायिक हे शेतकरीही आहेत. व्यवसायाच्या ठिकाणांच्या मागेच त्यांची शेती असल्याने व्यवसाय बंद झाल्यास त्यांच्या कुटुंबांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
हॉटेल व दुकाने हटविण्याची कारवाई प्रस्तावित असल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा विचार करावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
यावेळी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्र्यांच्या जमिनीच्या मुद्द्यावरही भूमिका मांडण्यात आली. संबंधित जमीनधारकाला त्या ठिकाणी शेती, फळबाग किंवा रिसॉर्ट उभारण्याचा अधिकार असला तरी, त्यासाठी गोरगरीब स्थानिकांच्या रोजगाराची साधने असलेली दुकाने व व्यवसायाची ठिकाणे अतिक्रमणाच्या नावाखाली हटविणे योग्य नसल्याचे काँग्रेसने म्हटले. स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम करणारी कारवाई थांबवून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.
“स्थानिक व्यावसायिकांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” अशी भूमिका आंदोलनावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनास जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, धिरज पाटील, धनंजय राऊत, शिवाजी गायकवाड, अरविंद बेडगे, अमोल कुतवळ, दिलीप भोकरे, सयाजी देशमुख, राजेंद्र शेंडगे, गौरीशंकर मुळे, अझहर, गोपाळ सुरवसे, हणमंत गवळी, दादासाहेब चौधरी, सिद्धेश्वर अण्णा कस्तुरे, सुनील माळी, सत्तार मुलाणी, गोविंद डोंगरे, डॉ. पंकज घुगे, पोपट मोटे, उत्तम दादा पाटील, संजय गुंजूटे, तुकाराम नवगिरे, ज्ञानेश्वर जगताप, सुमन नवगिरे, विकास वडणे, दीपक वडणे, अश्विनकुमार आतकरे, जुबेर शेख, संदीप सुरवसे, पेंदे, सौ. वाघे ताई शिंदे, भीमा रणसुरे, दादाराव नेटके, हरिदास घोटकर, निजाम शेख, तानाजी नेटके, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, तुळजापूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिकांचा रोजगार आणि उपजीविका अबाधित ठेवूनच प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.


