तुळजापूरच्या माळुंब्रा येथे प्रस्तावित हवाई धावपट्टीची पाहणी
भारतीय विमान प्राधिकरणाच्या पथकाची धाराशिव विमानतळाला भेट; कृषी, उद्योग, पर्यटनाला मिळणार चालना
धाराशिव : जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला नवी चालना देण्याच्या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या चार किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पाहणी केली. पाहणीनंतर पथकाने प्रस्तावित विमानतळाच्या जागेबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात असताना धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी माळुंब्रा येथे हवाई धावपट्टी उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही महिन्यांपासून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
प्रस्तावित धावपट्टीची जागा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गालगत असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिसरात मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याच्या दृष्टीने हवाई धावपट्टी महत्त्वाची ठरणार आहे. कृषी मालाची जलद वाहतूक, औद्योगिक गुंतवणुकीला चालना आणि तुळजापूरसह परिसरातील पर्यटनविकासासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद पोहोचण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर उद्योगांसाठी दळणवळणाची सुविधा सुधारून नव्या गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तुळजापूरच्या धार्मिक पर्यटनालाही या प्रकल्पाचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी
या पाहणीमध्ये भारतीय विमान प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर रोशन कांबळे, अनुराग मिश्रा, संजय उके, सुशिल वर्मा, प्रदीप मौर्या, संतू दास आणि राजेश जीवन यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे, महापारेषणच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता गायत्री काळे, उमेश मेहरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता आवाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
धाराशिव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव
माळुंब्रा येथील पाहणीनंतर भारतीय विमान प्राधिकरणाच्या शिष्टमंडळाने धाराशिव येथील हवाई धावपट्टी ही पाहणी केली. या धावपट्टीची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
याशिवाय धाराशिव विमानतळावर मिलिटरी ड्रोनच्या चाचण्या घेणे, भविष्यात ड्रोन निर्मिती तसेच संशोधन केंद्र विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे माळुंब्रा येथील प्रस्तावित हवाई धावपट्टी आणि धाराशिव विमानतळाचा नियोजित विकास या दोन्ही माध्यमातून जिल्ह्यात विमान वाहतूक, ड्रोन तंत्रज्ञान, कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात रोजगार व गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
माळुंब्रा येथील हवाई धावपट्टी प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्या धाराशिव जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला मोठे बळ मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला आणि दरडोई उत्पन्नवाढीलाही हातभार लागेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.



