
धाराशिव प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, वाहनचालक, नोकरदार तसेच समाजबांधवांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून, अंतरवाली सराटी येथील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हा जिल्हा बंद पुकारण्यात आल्याचे सकल मराठा समाजाच्या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळावे, या उद्देशाने जिल्ह्यातील विविध घटकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीला आपला पाठिंबा दर्शवावा आणि शांततेच्या व लोकशाही मार्गाने जिल्हा बंद यशस्वी करावा,” असे आवाहन करण्यात आले आहे.
हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन बलराज रणदिवे, अभिजीत सुर्यवंशी, मुकुंद घाडगे, तेजल नायकल, दादा गाढवे आदींच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा बंदच्या आवाहनामुळे धाराशिव शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था आणि वाहतूक व्यवस्था याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील व्यापारी व विविध घटकांकडून बंदला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“एक मराठा, लाख मराठा” आणि “जय जिजाऊ, जय शिवराय” या घोषणांसह सकल मराठा समाजाने जिल्ह्यातील नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


