दुष्काळाशी लढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही; शेतकऱ्यांना सरसकट मदत
धाराशिव, दि. २३ : पावसाच्या दीर्घ खंडामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. दुष्काळाचा सामना करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यात दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे साठवण तलाव आणि नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच कळंब तालुक्यातील मलकापूर येथे रामहरी लोमटे व संजय लोमटे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दोन्ही ठिकाणी त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता जाणून घेत शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीबाबत आश्वस्त केले.
दुष्काळाची स्थिती सरसकट; मदत सरसकट
पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्यामुळे तुळजापूर, कळंबसह जिल्ह्यातील अनेक भागांतील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पेरणीनंतर सुरुवातीला समाधानकारक परिस्थिती होती; मात्र पिकांच्या वाढीच्या आणि उत्पादनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने सोयाबीन सह अन्य पिकांचे नुकसान झाले.
करजखेडा येथील पाहणीदरम्यान साठवण तलावात पाणी नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शेतकरी बळी भोसले यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त ऊस आणि सोयाबीनची पाहणी केली. पेरणीची वेळ, झालेला पाऊस, पावसाचा खंड आणि पिकांवर झालेला परिणाम याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली.
“दुष्काळाची परिस्थिती सरसकट असल्याने मदतही सरसकटच देण्यात येईल. मदत देताना कोणतेही आढेवेढे घेतले जाणार नाहीत. पंचनामे कायदेशीर प्रक्रियेनुसार करावे लागतील; मात्र परिस्थिती सरसकट असल्याने मदतीचा निर्णयही सरसकट असेल,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर
कळंब तालुक्यातील मलकापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे पीक नुकसानीने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना देण्यात येणारी थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
दुष्काळाच्या काळात उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर पाणी उपलब्ध राहिल्यासच त्याचा अन्य कारणांसाठी वापर करता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुढील चार ते पाच महिने कठीण राहणार असून, या काळात नागरिकांनी एकमेकांना धीर देत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पीक विमा, चारा आणि अन्नधान्याची व्यवस्था
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. पीक कापणीचे प्रयोग सुरू असून पीक विम्याची मदत दिली जाईल. जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल. रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध असल्यास त्याचेही नियोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटल्याने शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. मुलांचे शिक्षणही थांबणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफी, वीज बिल माफीचा उल्लेख
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील, असे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या वीजबिलापोटी ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविताना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतकऱ्यांशी थेट संवाद
मुख्यमंत्री थेट बांधावर आल्याने करजखेडा व मलकापूर परिसरातील शेतकऱ्यांनी पीक नुकसान, उत्पादनातील संभाव्य घट, शेतीवरील खर्च आणि कुटुंबाच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामांची माहिती त्यांच्यासमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
“संकट मोठे आहे; मात्र सर्वांनी एकमेकांना धीर देत आणि सहकार्य करत या संकटातून मार्ग काढावा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
पाहणी दौऱ्यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, आमदार बसवराज पाटील, राणाजगजितसिंह पाटील, कैलास घाडगे-पाटील, अभिमन्यू पवार, प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख घोषणा
▪ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत
▪ दोन दिवसांत दुष्काळाचा शासन निर्णय
▪ दुष्काळासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही
▪ पीक विम्याची मदत दिली जाणार
▪ जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था
▪ पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
▪ थेट आर्थिक मदत बँक खात्यात
▪ अन्नधान्य व मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना
▪ कर्जमाफीची प्रक्रिया सुरू
▪ रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्धतेनुसार नियोजन


