Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

धाराशिव शहरात १० ठिकाणी पथविक्रेत्यांसाठी विक्री क्षेत्र निश्चित

पथविक्रेत्यांना लवकरच ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र; फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चितीवरही चर्चा

धाराशिव : शहरातील पथविक्रेते व फेरीवाल्यांच्या व्यवसायाला नियमनबद्ध स्वरूप देण्याच्या दृष्टीने नगर परिषद धाराशिवच्या नगर पथविक्रेता समितीची बैठक बुधवारी (२३ सप्टेंबर) मुख्याधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा निता अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पथविक्रेत्यांना विक्रीसाठी जागेचे नियोजन, फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चिती, पार्किंग व्यवस्था तसेच शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या बैठकीच्या प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.

धाराशिव शहरातील पथविक्रेते व फेरीवाल्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण पूर्ण झाले असून, संबंधित विक्रेत्यांना लवकरात लवकर ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वितरित करण्याच्या सूचना संबंधित एजन्सीला देण्यात आल्या. नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यासाठी मागील वर्षी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार समिती अधिकृतरीत्या राजपत्रित झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

अधिनियमानुसार पथविक्रेत्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच विविध निर्णयांसाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहितीही सदस्यांना देण्यात आली.

बैठकीत ‘पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना, २०२६’ या मसुद्याचे वाचन करण्यात आले. यावर कोणतीही हरकत अथवा सूचना प्राप्त न झाल्याने मसुद्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

१० ठिकाणी विक्रीसाठी जागा

शहरातील पथविक्रेते व फेरीवाल्यांसाठी विक्रीची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या १० ठिकाणी विक्रीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या जागांचे व्यवस्थित वाटप कसे करावे, यावरही चर्चा करण्यात आली.

पथविक्रेत्यांमुळे रस्त्यांवर होणारी गर्दी, वाहतुकीला निर्माण होणारे अडथळे आणि संभाव्य अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पथविक्रेते व फेरीवाल्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी केले.

तसेच फेरीवाला क्षेत्र आणि ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे, पार्किंग झोन व नो-पार्किंग झोनचे फलक लावणे, तसेच शहरातील मार्केट डेव्हलपमेंट प्लॅन याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये आणि पथविक्रेत्यांचेही व्यवसाय सुरळीत सुरू राहावेत, यासाठी नियमांचे पालन करण्यास समिती सदस्यांनी पथविक्रेते व फेरीवाल्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले.

शहर स्वच्छ व सुशोभित ठेवण्यासाठी घंटागाडी आणि कचराकुंड्यांचा योग्य वापर करावा, कचरा रस्त्यावर टाकू नये आणि नगर परिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेला सहकार्य करावे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस मुख्याधिकारी तथा नगर पथविक्रेता समितीच्या अध्यक्षा निता अंधारे, उपमुख्याधिकारी अभिजीत गोरे, वाहतूक शाखेचे PSI शि. पि. मुंडे, एल. एम. धादागिणे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वैशाली आवाड यांनी केले.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी