Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

तेरखेडा हायवेवरील अपघातातील फरार आरोपी अखेर जेरबंद

१९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अपघात करून मदत न करता पळालेला टेम्पोचालक स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

धाराशिव : तेरखेडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर स्कुटीला धडक देऊन १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आणि अपघातानंतर जखमीला मदत न करता घटनास्थळावरून फरार झालेला टेम्पोचालक अखेर पोलिसांच्या हाती लागला. स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव आणि येरमाळा पोलिसांच्या संयुक्त तपासातून आरोपीचा शोध घेण्यात आला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराज श्रीकृष्ण चव्हाण (वय १९, रा. लक्ष्मीनगर, भूम) हे २९ सप्टेंबर रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास स्कुटी क्रमांक एमएच २५ बीएच ५५८१ वरून जात होते. तेरखेडा येथील वनविभागाच्या जागेसमोर एनएच-५२ वर अज्ञात वाहनचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत यशराज यांच्या स्कुटीला समोरून धडक दिली.

 

या भीषण अपघातात यशराज चव्हाण गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले. उपचाराअभावी यशराज यांचा मृत्यू झाला.

 

याप्रकरणी मृताचे वडील श्रीकृष्ण रामलिंग चव्हाण (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, भूम) यांनी ३० सप्टेंबर रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ३४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४(अ)(ब) व १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्ह्याचा तपास सुरू असताना येरमाळा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फरार वाहनाचा माग काढला. तपासात संबंधित वाहन राजेश नगर, ढोकी येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवून शुभम अच्युत काळे (वय २२, रा. राजेशनगर, ढोकी, ता. जि. धाराशिव) याचा शोध घेतला. त्याच्याकडून अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एमएच ४७ वाय ३४२५ ताब्यात घेण्यात आला. आरोपी व वाहन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विनोद इज्यापवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके तसेच येरमाळा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी