८ सप्टेंबरपासून पूर्वसूचनेविना कारवाई, हातगाड्या-टपऱ्या जप्त करून दंडात्मक कारवाईचा इशारा
धाराशिव : शहरातील मुख्य रस्ते आणि पदपथांवर थाटलेल्या अतिक्रमणांविरोधात धाराशिव नगरपरिषदेने आता कठोर भूमिका घेतली आहे. फळविक्रेते, हातगाडीचालक आणि पानटपरीधारकांनी ७
सप्टेंबरपर्यंत स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा ८ सप्टेंबरपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला होता
छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुळजाभवानी व्यापारी संकुल तसेच एस.टी. स्टँड परिसर ते सेंट्रल बिल्डिंग या प्रमुख रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. हातगाड्या, फळांचे स्टॉल आणि पानटपऱ्यांमुळे रस्त्यांची उपलब्ध रुंदी कमी होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या अतिक्रमणांचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना बसत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि संभाव्य अपघातांना आळा घालण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.
८सप्टेंबरनंतर मुख्य रस्त्यावर अथवा सार्वजनिक जागेवर अतिक्रमण आढळल्यास संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नाही.हातगाड्या, टपऱ्या व इतर साहित्य जप्त करून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. जप्त केलेले साहित्य नष्ट करण्याची कारवाईही प्रशासकीय पातळीवर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान साहित्याचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारकाची राहील, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, शहरातील मुख्य रस्ते व पदपथ वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्यासाठी फळविक्रेते, हातगाडीचालक आणि पानटपरीधारकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून मुदत संपण्यापूर्वी अतिक्रमणे स्वतःहून हटवावीत, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.


