खासदार ओमराजे निंबाळकर यांचा भाजप आमदार पाटील यांना तुळजापूर मध्ये पहिला झटका
धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी घडामोड चर्चेत आली आहे. प्रतीक रोचकरी यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रोचकरी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती या घडामोडीचे राजकीय महत्त्व अधोरेखित करत आहे. शिवसेनेच्या भगव्या ध्वजाच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे छायाचित्रही चर्चेचा विषय ठरले आहे.
प्रतीक रोचकरी यांचा धाराशिव जिल्ह्यातील युवा राजकारणात सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाचा आगामी काळातील स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या वेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.
भाजपमधून शिवसेनेत झालेला हा प्रवेश म्हणजे रोचकरींची ‘घरवापसी’ की नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात? याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.


