Saturday, September 5, 2026

Epaper

spot_img

श्री तुळजाभवानी मंदिराला MSFचे सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवान तैनात; भाविकांशी सौजन्याने वागण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या सूचना

धाराशिव | प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) ११६ अधिकारी व सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर MSFच्या अधिकारी व जवानांनी तुळजापूर शहर तसेच श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातून रूट मार्च काढला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस व प्रशासनिक अधिकाऱ्यांनी MSFच्या अधिकारी-जवानांचे स्वागत करून मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, तुळजापूर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, मंदिर चौकीचे पोलीस निरीक्षक येवते, MSF सुरक्षा अधिकारी प्रदीप पाटील, सहायक सुरक्षा अधिकारी रुपेश देशमुख, मंदिर सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, नवनाथ खिंडकर, ऋषभ रेहपांडे यांच्यासह पोलीस, मंदिर प्रशासन आणि MSFचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सर्व सुरक्षा यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, भाविकांशी सौजन्याने वागावे आणि भाविकाभिमुख दृष्टिकोन ठेवून कर्तव्य बजावावे, अशा सूचना देण्यात आल्या. सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तीला थारा देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी भाविकांमध्ये सुरक्षा यंत्रणेबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. भाविकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवून त्यांना सुरक्षिततेचा विश्वास देण्याच्या सूचना त्यांनी MSFच्या अधिकारी-जवानांना दिल्या.

उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी देवीने प्रदान केलेल्या भवानी तलवारीचा उल्लेख करून या पवित्र भूमीत कर्तव्य बजावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. देवीचा आशीर्वाद घेऊन दररोज कर्तव्याची सुरुवात करावी आणि भाविकांच्या सेवेसोबतच मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी निष्ठेने पार पाडावी, असा सल्ला त्यांनी दिला.

तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील प्रथा, परंपरा आणि धार्मिक विधींची माहिती MSFच्या अधिकारी-जवानांना दिली. सुरक्षा व्यवस्था राबविताना मंदिराच्या धार्मिक प्रथा-परंपरांची जाणीव ठेवून भाविकांशी संयमाने व संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

तुळजापूर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. सर्वसामान्य भाविकांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनावेळी आवश्यक सुरक्षा खबरदारी व नियोजन ठेवण्याची सूचना त्यांनी केली. मंदिर परिसरातील संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देऊन पोलीस आणि MSFच्या जवानांनी समन्वयाने कर्तव्य बजावावे, असेही त्यांनी सांगितले.

मंदिर चौकीचे पोलीस निरीक्षक येवते यांनी मंदिर संस्थानकडून पोलीस प्रशासनाला वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याचा उल्लेख केला. सलग सुट्ट्या, सण-उत्सव आणि गर्दीच्या काळात मंदिर परिसरात बंदोबस्त बजावताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. अशा काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सतर्कता, संयम आणि परस्पर समन्वय ठेवून कर्तव्य बजावण्याचे आवाहन त्यांनी केले.

११६ MSF अधिकारी-जवानांची तैनाती

श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी MSFचे एकूण ११६ अधिकारी व सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये सहा अधिकारी असून, एक पोलीस निरीक्षक (PI), चार पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि एक सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यांचा समावेश आहे. पथकात महिला अधिकारी व सुरक्षा जवानांचाही समावेश आहे.

MSFच्या तैनातीमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, गर्दी नियंत्रण, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक बळकट होणार आहे.

MSFला कायदेशीर अधिकार

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम, २०१० अंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या सदस्यांना कायद्यानुसार विशेष पोलीस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला असून, सुरक्षा कर्तव्य बजावताना त्यांना कायद्यात नमूद विशिष्ट अधिकार व जबाबदाऱ्या प्रदान करण्यात आल्या आहेत.

सुरक्षा कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करणे तसेच कायद्यात नमूद परिस्थितीत वॉरंटशिवाय संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे अधिकार MSFला प्रदान करण्यात आले आहेत.

भाविकांची सुरक्षितता, मंदिराची पवित्रता आणि शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था यासाठी पोलीस, मंदिर प्रशासन आणि MSF यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी