पहिल्या यादीतील उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.२५ ऑगस्ट (जिमाका) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर सुमारे ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम २४ ऑगस्ट २०२६ रोजी ऑनलाइन पोर्टलद्वारे थेट जमा करण्यात आली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील २१ हजार ७९३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १८३ कोटी ८५ लाख ८९ हजार ९५६ रुपये जमा करण्यात आले आहेत.
या योजनेसाठी पहिल्या प्रसिद्ध झालेल्या यादीतील उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी लवकरच शासनाकडून प्रसिद्ध होणार आहे.
मंत्रिमंडळाची २ जूनला मान्यता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ या योजनेस २ जून २०२६ रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेच्या काही निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली.
योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता (OTS) या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खासगी बँका अशा एकूण ५३ बँकांनी शेतकऱ्यांच्या सुमारे ३२ लाख कर्जखात्यांची माहिती महा-आयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड केली.यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ९७ हजार ८७३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.२५ जुलै २०२६ रोजी योजनेतील निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी राज्यातील सुमारे १६.९६ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.या यादीत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ४६ हजार ९१५ थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
११ हजार ७९३ शेतकऱ्यांना नव्याने लाभ
२४ ऑगस्ट रोजी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या राज्यातील सुमारे ६ लाख ३६ हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपये जमा करण्यात आले.धाराशिव जिल्ह्यातील २१ हजार ७९३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १८३ कोटी ८५ लाख ८९ हजार ९५६ रुपये जमा झाले आहेत.यामध्ये धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ३९८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या ८ कोटी ३८ लाख ३९ हजार ७७३ रुपयांच्या रकमेचा समावेश आहे.यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील १२ हजार २१४ लाभार्थी शेतकऱ्यांना १०५ कोटी ८६ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यात आता नव्याने मिळालेल्या लाभाची भर पडल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ७ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७२ लाख ४४ हजार ६६० रुपयांचा लाभ मिळाला आहे.
खरीप पीक कर्ज वाटपाचे बँकांना निर्देश
योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्जाचे वाटप करण्याबाबत सर्व बँकांना शासनामार्फत निर्देश देण्यात आले आहेत.या योजनेसाठी २२ जुलै व ३० जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ७ हजार १ कोटी रुपये,तर १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ४ हजार कोटी रुपये असा एकूण ११ हजार १ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने सहकार आयुक्त तथा निबंधक,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना उपलब्ध करून दिला आहे.
पहिल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे.आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर त्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


