Saturday, September 5, 2026

Epaper

spot_img

‘खेलेगा भारत, जितेगा भारत’चा धाराशिवमध्ये जागर

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव — जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष   धाराशिव, दि. १ : मैदानावर घाम गाळून यशाचे शिखर गाठणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतानाच नव्या पिढीत क्रीडाविषयी आवड निर्माण करण्याचा संदेश धाराशिवमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देण्यात आला. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेतून २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच जिम्नॅस्टिक्स आणि तलवारबाजीच्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा एकविध क्रीडा संघटना, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भारताचा समृद्ध क्रीडा वारसा आणि महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. सन २०२६ मध्ये ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ ही संकल्पना घेऊन ‘आदर, खेळ आणि हालचाल’  या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले.

‘२९ आव्हाने’मधून खेळाडूंचे कौशल्य राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपक्रमांची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ‘२९ आव्हाने’  या उपक्रमांतर्गत खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.यामध्ये पुश-अप्स, सिट-अप्स, शटल रन यांसह विविध शारीरिक क्षमतांशी संबंधित आव्हाने पूर्ण करण्यात आली. ‘पास द बॉल चॅलेंज’मध्ये मैदान तसेच विविध क्रीडा अकादमींमधील खेळाडूंनी एकमेकांकडे चेंडू पास करण्याचे आव्हान स्वीकारले. या उपक्रमातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सांघिक भावना आणि खेळातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांना अभिवादन   २९ ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद तसेच भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रोहिणी आवारे, आर्चरी संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, तलवारबाजी संघटनेचे सचिव श्रीकांत गरड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, डॉ. देडे, अविनाश थोरबोले, यशोदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

‘खेळातून आयुष्यात अनेक संधी’ शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रोहिणी आवारे यांनी खेळाडूंशी संवाद साधताना मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची माहिती दिली. खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकासासोबतच शिक्षण, रोजगार आणि विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले.जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना खेळ आणि शारीरिक सक्रियता ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे, असे अधोरेखित केले.

जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी रंगत जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी डिंपल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर श्रीधर सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजीच्या कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. खेळाडूंचा वेग, तंत्र आणि कौशल्य पाहून उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

गुणवंत खेळाडूंचा गौरव राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सत्कारामुळे खेळाडूंमध्ये नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले, तर क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी