प्लास्टिक पिशव्यांवर नगरपरिषदेचा दणका!
धाराशिव : शहर
प्लास्टिकमुक्त करण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेने आता कारवाईचा धडाका सुरू केला आहे. प्लास्टिक बंदीची पायमल्ली करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात नगरपरिषदेच्या विशेष पथकाने धडक मोहीम राबवत २५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ दुकानदारांवर एकूण २३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध बाजारपेठा व व्यावसायिक प्रतिष्ठानांची अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सहा मोठ्या दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. पथकाने तत्काळ हा प्लास्टिक साठा जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.
‘प्लास्टिक वापराल तर कारवाईला सामोरे जा’, असा स्पष्ट इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे. यापुढे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठा किंवा विक्री आढळल्यास दुकान सील करण्यासह कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्लास्टिकमुक्त शहरासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी प्रशासनाच्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेला सहकार्य करावे. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, ही मोहीम केवळ एक-दोन दिवसांची नसून यापुढेही सातत्याने आणि अधिक तीव्रतेने तपासणी व कारवाई सुरू राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


