Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

टँकर, चारा व पिण्याच्या पाण्याचे आतापासून नियोजन करा — पालकमंत्री प्रताप सरनाईक

न घाबरता सूक्ष्म नियोजनातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करा

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश

पाणीटंचाई, चारा व पीक नुकसानीचा आढावा; टँकरचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचना

धाराशिव, दि. १७ सप्टेंबर : पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी पाणीटंचाई, पीक नुकसान, चारा उपलब्धता आणि आगामी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टँकरसाठी आतापासून नियोजन

जिल्ह्यात पावसाची मोठी तूट असून पावसाच्या दीर्घ खंडाचा खरीप पिकांना फटका बसला आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक ठिकाणी टँकरचे नियोजन आतापासूनच करावे, तसेच चारा उपलब्धतेबाबतही पूर्वतयारी करावी, असे सरनाईक यांनी सांगितले.

सिंचन प्रकल्पांत केवळ ८ टक्के पाणीसाठा

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये एकूण क्षमतेच्या केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध जलसाठ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता शेतीसाठी सिंचनाचे पाणी देणे बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, भूजल पातळीतही मोठी घट झाली असून काही भागांत भूजल पातळी सुमारे सात मीटरने खाली गेल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

पीक नुकसानीसाठी भरीव मदतीची मागणी

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाल्याचे सांगत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. पीक नुकसानीचे पंचनामे प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पीक कापणी प्रयोगाचे काम एका आठवड्यात पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली.

वीज भारनियमन थांबविण्याचे निर्देश

पीक वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यावर सिंचन करावे लागत आहे, अशा काळात आपत्कालीन वीज भारनियमन करू नये, असे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी महावितरणला दिले.

पाणी-चाऱ्यासाठी प्रशासन सज्ज

धाराशिव तालुक्यात पाच आणि लोहारा तालुक्यात एक टँकर सुरू असून १८४ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जुलै २०२७ पर्यंतचा जिल्हा पाणीटंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पिण्याचे पाणी, चारा आणि पीक नुकसान या तिन्ही बाबींवर प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करावे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी