Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

पिकांचे १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करा

आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती व भाजीपाल्याचाही समावेश

धाराशिव : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून प्रत्यक्ष पूर्ण नुकसान झालेल्या क्षेत्राची १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून नोंद करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यासंदर्भात आ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पावसामध्ये पडलेल्या प्रदीर्घ खंडामुळे तसेच निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील उभी पिके करपली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांमध्ये काही ठिकाणी प्रत्यक्ष नुकसान मोठ्या प्रमाणावर असतानाही संपूर्ण बाधित क्षेत्राची १०० टक्के नुकसानग्रस्त म्हणून नोंद होत नसल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई व शासनाच्या इतर मदतीपासून संबंधित शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह मूग, ऊस, फळबागा, फुलशेती आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली असून काही क्षेत्रांमध्ये उत्पादन जवळपास नष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत पीकनिहाय, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पाहणी करून प्रत्यक्ष पूर्ण नुकसान झालेल्या क्षेत्राची १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून नोंद करावी. तसेच पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल तातडीने शासनाकडे सादर करून शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल, कृषी आणि इतर विभागांना तातडीने आवश्यक आदेश देऊन पंचनाम्यांची कार्यवाही गतिमान करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी