एमपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या पेपरफुटी संदर्भात चौकशी करणे तसेच एमपीएससी अध्यक्ष व सचिव यांचा राजीनामा घेणे या प्रमुख मागण्यांसाठी धाराशिव येथील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी निवासी जिल्हाधिकारी तसेच आमदार कैलास पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. आज राज्यातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असून पेपरफुटी प्रकरणांमुळे त्यांचा एमपीएससी वरील असलेल्या विश्वासाला तडा गेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात त्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या असून त्याचे निरसन करणे आवश्यक आहे. या संदर्भात सदरील विद्यार्थ्यांनी एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष आणि सचिवांचे राजीनामे घेऊन, तात्काळ स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नेमावेत. गट ब परीक्षेतील आक्षेपांवर आठ दिवसात स्पष्टीकरण देऊन गैरप्रकाराची चौकशी करावी. आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट क पूर्व परीक्षा तसेच आयोगाच्या इतर नियोजित सर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शकपणे घेण्यात याव्या अशा प्रमुख मागण्या मांडल्या. कळंब- धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करत हा विषय राज्यपाल महोदय तसेच मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहचवण्याचे वचन दिले. यावेळी विद्यार्थी नेतृत्व म्हणुन प्रतीक कांबळे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. तर मंगेश बांगर, पंकज मुंडे, विशाल साळुंके, आकाश बळी, गवळी आशितोष, साईनाथ कोकाटे, सुरज कोळी, पवन गाढवे, भालचंद्र भवर, सुधीर जाधव, अमर कानवले इत्यादींनी सहभाग नोंदवला.


