Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

धाराशिवमध्ये रोहित पवारांकडून पीक पाहणी; सोयाबीनच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल

हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

धाराशिव, दि. २० : पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पीक पाहणी केली. कळंब तालुक्यातील रत्नापूर तसेच येरमाळा परिसरात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सोयाबीनसह अन्य पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.

पावसाअभावी अनेक ठिकाणी सोयाबीनची झाडे सुकून करपली असून, हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर खर्च करूनही पावसाने दगा दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पवार यांच्या पाहणीत समोर आले.

सरसकट मदतीची मागणी

पीक पाहणीनंतर रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली. तसेच शेतीतील कामे ठप्प झाल्याने मजुरांच्या कुटुंबांनाही आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील पाच दिवसांत चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत आणि पीकविम्याची रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा मुद्दाही पवार यांनी उपस्थित केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती पाहता शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र मोठे असून, पिकाच्या निर्णायक अवस्थेत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने नुकसान वाढल्याचे वृत्त आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शेतशिवारात सोयाबीन पिकाची पाहणी करताना आमदार रोहित पवार व उपस्थित शेतकरी.

 

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी