Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

बनावट कार्ड अन् खऱ्या धमक्या; तुळजापुरात एसटी कर्मचाऱ्यांना दमदाटी

तुळजापूर : बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून एसटी बसमध्ये सवलतीचे तिकीट घेतल्याचा प्रकार समोर आला असून, बस चालक व वाहकास शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन बापुराव लोखंडे व राम शिंदे (रा. आंबेजवळगे, ता. जि. धाराशिव) यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.३५ ते ७.१५ वाजण्याच्या सुमारास कावलदरा ते तुळजापूर बसस्थानकदरम्यान हा प्रकार केल्याचा आरोप आहे.

 

फिर्यादी उमेश दिलीप पवार (वय ४४), रा. भवानीनगर, धाराशिव, हे धाराशिव आगारातील एसटी बस चालक म्हणून कर्तव्यावर असताना आरोपींनी ५३ टक्के शारीरिक दुर्बलतेचे बनावट कार्ड वापरल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या बनावट कार्डच्या आधारे सवलतीचे तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करून एसटी प्रशासनाची तसेच शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

 

दरम्यान, कार्ड देण्यास नकार दिल्याने आरोपींनी चालक व वाहकास शिवीगाळ करून “माझे कार्ड दे, नाहीतर तुला या रोडवर ड्युटी करू देणार नाही”, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच बस अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.

 

महिला वाहकास निलंबित करण्याची धमकी देत दबाव आणण्यात आला. तसेच बनावट कार्ड असूनही वन-फोरचे तिकीट देण्यास वाहकास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणी उमेश पवार यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १३२, २२१, २३८, ३१८(४), ३३६(३), ३४०(२), १२६, ३५१(२)(३), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी