Saturday, September 5, 2026

Epaper

spot_img

धाराशिवच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राजाभाऊ पवार भाजपच्या वाटेवर

नगरसेवक फुटीच्या चर्चेदरम्यान ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांची भेट; राजकीय समीकरणांना नवी दिशा

धाराशिव नगर परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाचा आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा घटनाक्रम सुरू असतानाच आता गटनेते राजाभाऊ पवार यांच्या एका भेटीने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राजाभाऊ पवार यांनी ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, युवा नेते मल्हार पाटील तसेच मनोगत शिनगारे उपस्थित होते. या भेटीचे राजकीय महत्त्व मोठे मानले जात असून, पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, धाराशिव नगर परिषदेत उबाठा गटातील चार नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर, राजाभाऊ पवारदेखील त्याच दिशेने जातील, अशी राजकीय चर्चा रंगली होती. मात्र डॉ. पद्मसिंह पाटील यांची घेतलेली भेट आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

गटनेते म्हणून राजाभाऊ पवार यांच्याकडे नगर परिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास नगर परिषदेतील सत्तासमीकरणांवर त्याचा नेमका काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, गटनेतेपदाचा अनुभव आणि नगर परिषदेमधील संख्याबळ लक्षात घेता, पवार भाजपच्या माध्यमातून कुठली कायदेशीर अथवा राजकीय खेळी खेळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

आता राजाभाऊ पवार यांची पुढील भूमिका काय असणार आणि त्यांच्या निर्णयामुळे धाराशिव नगर परिषदेतील राजकीय गणित कोणत्या दिशेने फिरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी